ED ने बदलला मनसेचा झेंडा आणि अजेंडा?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाची बदलली भूमिका मांडली. या अधिवेशनात पक्षाने आपला झेंडाही बदलला आणि अजेंडाही बदलला. लाव रे तो व्हिडीओ असे म्हणत लोकसभा निवडणुकीला मोदी सरकारची पोलखोल करणारे राज ठाकरे आता मोदी सरकारच्या धोरणांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहेत. 9 फेब्रुवारीला CAA, NRC विरोधात सध्या देशभर काढल्या जाणाऱ्या मोर्चांना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे मोर्चा काढणार आहे. यामुळे भाजपवर जोरदार टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी भाजपला अनुकूल भूमिका का घेतली? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांच्या मागे ED चे शुक्लकाष्ट लागले. ED चौकशी सुरू झाल्यानंतर राज ठाकरे यांचा मोदी सरकार विरोधातील सूरही नरमला. विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी भाजपवर निशाणा साधला नाही. सक्षम विरोधी पक्षासाठी मते त्यांनी मागितली.

आज झालेल्या भाषणात राज ठाकरे यांना प्रखर हिंदुत्वाची आठवण झाली. पुन्हा ठाकरे यांनी हिंदुत्वाचा राग आळवला. आतापर्यंत झालेल्या सभेत व्यासपीठावर सावरकरांचा फोटो दिसला नाही मात्र या अधिवेशनात सावरकरांचा फोटो दिसून आला. हिंदुत्व ही बदलली भूमिका ठीक जरी मानली तरी CAA, NRC च्या समर्थनार्थ मोर्चा कशासाठी हा प्रश्न पुन्हा उभा राहतो. ED च्या चौकशीमुळे तर राज ठाकरे यांची भूमिका बदलली नाही ना असा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. ED मुळे तर मनसेचा झेंडा आणि अजेंडा बदलला नाही ना?