ग्रामीण विकासामध्ये ग्रामसेवकांची महत्वाची भूमिका – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्याचे काम ग्राम दक्षता समितीबरोबर ग्रामसेवकांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवून गरजुना लाभ देण्याचे कामही करीत आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासामध्ये ग्रामसेवकांची महत्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

जिल्हा स्मार्ट ग्राम व तालुका सुंदर गाव म्हणून घोषीत करण्यात आलेल्या ग्रामपंचायती, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व महा-आवास अभियान सन 2020-21 पुरस्कार वितरण व महा -आवास अभियान ग्रामीण 2.0 (सन 2021-22) चा शुभारंभ पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बाल विकास समितीच्या सभापती सोनाली पोळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माधव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, मनोज जाधव, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, गावातील कुटुंबांची संख्या, गरजुंना कोणत्या योजनेचा लाभ दिला पाहिजे यासह गावातील सर्व माहिती ग्रामसेवकाला असते. यामुळे ग्रामसेवक गावातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्यास यशस्वी झाला आहे. ग्रामसेवकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाकडे मांडल्या जातील. त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. पंचायतराज मुळे राजकारणात व समाज कारणात चांगले व अनुभवी नेतृत्व तयार होत आहे. महा -आवास अभियान ग्रामीण 2.0 योजनेचा आज जिल्ह्यात शुभारंभ होत आहे. मागील काळात जिल्ह्यात घरकुलांचे काम चांगल्या पद्धतीने झाले. या अभियानात सुद्धा जास्तीत जास्त गरजु लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देवून हक्काचे घर कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. कबुले म्हणाले, विविध घरकुल योजनेतून जवळपास 15 हजार घरकुले उभी करण्यात आली आहेत. जिल्ह्याने 86 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकीक राज्यासह देशात आहे. केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजना राबविण्यात नेहमीच सातारा जिल्हा परिषद अग्रेसर राहिला आहे. यापुढेही सातारा जिल्हा परिषद राज्यात अग्रेसरच राहिल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सातारा जिल्हा परिषद नेहमीच विविध योजना राबविण्यात आघाडीवर राहिले आहे. यापुढे ग्रामपंचायतींनी पर्यावरण पुरक कामांवर भर दिला पाहिजे. तसेच गावाचा सर्वांगीण विकासाची कामे हाती घ्यावीत. याबरोबरच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिकतेचा वापर केला पाहिजे, असे प्रास्ताविकात विनय गौडा यांनी सांगितले. या कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती, विविध गावाचे सरपंच, ग्रामसवेक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

Leave a Comment