बीड बायपास रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था उत्तम करा; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या बीड बायपास रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केली. झाल्टा फाटा ते महानुभवान चौक या 14 कि.मी. रस्त्यादरम्यान होत असलेल्या रस्ते, पूल आदी कामांची प्रत्यक्ष पाहणी करत या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, रस्ता दुभाजक, ब्लिंकर्स, हायमास्ट आदींसह पोलिस, महसूल विभागाची चौकी तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या.

पाहणीची सुरूवात झाल्टा फाटा येथून झाली. याठिकाणी बीड बायपासकडून शेंद्राकडे जाणा-या चौकात हायमास्ट, रस्ता दुभाजकांवरील गवत काढणे, दुभाजकांची रंगरंगोटी करणे, हायमास्टच्या खाली वर्तुळाकार पोलिस आणि महसूल विभागाची चौकी करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. त्यानंतर बाळापूर येथील यार्डला देखील भेट देखत रस्ता कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनसामुग्रीची पाहणी चव्हाण यांनी केली. त्याचबरोबर रस्ते, पुलांची कामे करताना वृक्षतोड होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्याबाबत निर्देशही चव्हाण यांनी दिले.

देवळाई चौक येथे पोलिसांसाठी रेस्ट रूम, एमआयटी येथील होत असलेल्या पुलाच्या ठिकाणी पाण्याचा शिडकावा करावा, सोलापूर-धुळे महामार्ग खुला झाल्यास बजाज हॉस्पीटलजवळील सुधाकर नगर येथून येणाऱ्या ठिकाणी दूभाजक खुला करण्यात यावा, महानुभाव चौकात झाल्टा फाट्याजवळील चौकीप्रमाणेच पोलिस, महसूल विभागाची चौकी उभारण्यात यावी. शिवाय वाहतुकीला अडसर होऊ नये, अपघात होऊ नयेत याचा विचार करत विजेचे युनिक पोल बसविण्यात यावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या.

Leave a Comment