पंकजा मुंडे तुम्ही दुसरा पक्ष काढा, आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ; इम्तियाज जलील यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्यावतीने नुकतीच राज्यसभेची निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर ठरले आहेत. या निवडणुकीत व विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावरून आता एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट पंकजा मुंडे यांना प्रस्ताव दिला आहे. पंकजा मुंडे यांनी भाजपाला रामराम ठोकून नवा पक्ष स्थापन करावा. त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली तर आम्ही त्यांना पाठींबा देऊ, असे जलील यांनी म्हंटले आहे.

इम्तियाज जलील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. यावेळी जलील म्हणाले की, भाजपचे हे धंदे आम्हाला चांगलेच माहिती आहेत. सत्तेत असताना गोट्या खेळायच्या आणि सत्तेतून गेल की मोर्चे काढायचे असे धंदे भाजपने सुरू केले आहेत, लोकांना उल्लू बनवण्याची धंदा भाजपचा सध्या सुरु आहे.

पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांना माणणारा खूप मोठा वर्ग आहे. राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी खूप मोठ मोठी कामे केली आहेत. हे काम कोणीही विसरलेले नाही. मग इतकी लाचारी कशाला? विधानपरिषद दिली नाही तर फक्त नाराजी कशाला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पक्षाला रामराम ठोकून नव्या पक्षाची घोषणा करायची असती. त्या ओबीसीच्या नेत्या म्हणून उभ्या राहतील तेव्हा त्यांच्या मागे किती मोठी ताकद उभी राहील हे पाहायला मिळेल, असे म्हणत जलील यांनी एकप्रकारे त्यांना पाठींबाच दर्शवला आहे.

Leave a Comment