‘हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही’; इम्तीयाज जलीलांची सत्ताधाऱ्यांना तंबी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
आजचे देशातील सत्ताधारी मुस्लिमांना दहशतवाद्यांच्या नजरेतून बघतात. सिमी काय, आयसिस काय, मुजाहिद्दीन काय, दहशतवादी म्हटलं की आम्हालाच टार्गेट करतात. पण एक भारतीय मुस्लीम म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो, हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचाही आहे असा घणाघाती पवित्रा एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांनी आज परभणीत घेतला.

या सभेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीची पुढील निवडणुकीतील दिशा स्पष्ट केली. ‘आधी भाजप-सेना बोलायची आणि काँग्रेस-राष्ट्रवादी ऐकून घ्यायची. आम्ही मात्र आता ऐकून घेणाऱ्यातले नाही. आम्हालाही बोलता येतं हे आम्ही दाखवून दिलंय. आता आम्ही बोलणार आणि हे तुम्हालाच नाही तर तुमच्या बापालाही ऐकावं लागेल’ असं जाहीर आव्हान जलील यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं.

परभणीतील शंभर मुस्लिम तरुण दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचं भाष्य काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदारांनी केलं होतं. याला उत्तर देताना जलील बोलत होते. परभणी विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अलीखान मोईन खान यांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी यांची दर्गा रोड येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी एमआयएम पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी, माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन, रशीद इंजिनिअर, एमआयएमचे उमेदवार अली खान मोईन खान, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.इम्तियाज खान, शहराध्यक्ष शेख अखील, नगरसेवक सय्यद माजीद, नगरसेवक जाकेरलाला, रफीउद्दीन अशरफी आदी उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्यात सर्वच पक्षांच्या प्रचाराला आता वेग आला आहे. राजकारणातील स्टार प्रचारकांच्या तोफाही धडाडू लागल्या आहेत. येत्या काळात परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघणार आहे एवढं मात्र नक्की.

इतर काही बातम्या- 

 

 

 

Leave a Comment