औरंगाबाद : शहरात कोरोनाची दुसरी लाट आता कमी झाली असल्याने रुग्ण संख्याही घटली आहे. मात्र गेल्या आठ दिवसात सात बालके कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बालकांची रुग्ण संख्याही कमी झाली आहे. गेल्या आठ दिवसात फक्त लहान मुले पॉझिटिव्ह आढळल्याने संभाव्य तिसऱ्या लाटे बाबत प्रशासनाला दिलासा मिळालेला आहे.
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने आधीपासूनच तयारी सुरू केली गेली. त्यामध्ये बाल कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तसेच बाल रोग तज्ञ यांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. गरवारे कंपनीच्या माध्यमातून बालकांसाठी कोविड केअर सेंटर केले जात आहे. एमजीएमच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे काही बेड बालकांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. एन-8 तसेच कोरोना बाधित गरोदर मातांसाठी सिडको येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात 50 खाटांची सोय असेल.
10 ते 17 जून दरम्यान केवळ सात बालके कोरोना बाधित आढळून आली आहेत. त्यात 0 ते 5 या वयोगटातील दोन तर सहा ते आठ या वयोगटातील पाच बालकांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत 0 ते 5 वयोगटातील तेराशे 94 तर 6 ते 18 वयोगटातील 7810 एकूण 9204 बालकांना कोरोना संसर्गाची लागण झाली असल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.