औरंगाबाद | गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील पार्किंग व हॉकर्स झोनसंदर्भात चर्चा सुरू आहे. यासंदर्भातील मसुदा पंधरा दिवसात तयार करून तो सादर करावा, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी समितीला दिले आहेत. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर शहरातील हॉकर्स झोन अंतिम केले जाणार आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत फुटपाथसह चौकांमध्ये हातगाड्यांचे अतिक्रमण वाढत आहे. याठिकाणी बेशिस्त पार्किंग केली जाते. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी पार्किंग व हॉकर्स झोन निश्चित केले जाणार आहेत. मात्र यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून केवळ बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान काल पांडेय यांनी दालनात आढावा बैठक घेतली.
यासंदर्भात धोरण ठरवण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीतील तज्ज्ञ तृप्ती अमृतवार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. पार्किंगसंदर्भातील नियमावली तयार करण्यात यावी, प्रायोगिक तत्वावर पाच प्रकल्प राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. पार्किंग व हॉकर्स झोन हे एकमेकांशी निगडित असल्याने त्याचा विचार व्हावा, अशी सूचना पांडेय यांनी केली. धोरण निश्चित करताना नागरिकांचे आक्षेप व सल्ला लक्षात घेतला जाणार आहे. बैठकीला शहर अभियंता सखाराम पानझडे, नगर रचना विभागाचे उपसंचालक जयंत खरवडकर, उपायुक्त अपर्णा थेटे, उपअभियंता संजय कोंबडे, स्मार्ट सिटीच्या सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, अर्पिता शरद, अर्बन रिसर्च फाउंडेशनचे श्रीनिवास देशमुख, पल्लवी देवरे, मधुरा कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदींची उपस्थिती होती.
एजन्सीची होणार नियुक्ती –
शहरातीचे पार्किंग व हॉकर्स धोरण ठरविताना मुंबई, पुणे व बंगळुरू शहराचा मसुदा मागविण्यात आला आहे. त्या अधारे औरंगाबाद शहराचे पार्किंग धोरण निश्चित केला जाईल. दरम्यान महापालिकेतर्फे लावण्यात येणारे दंड वसूल करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्याचे संकेत बैठकीत प्रशासकांनी दिले.