आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे : ओ. पी. गुप्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस पडत आहे. कुठेही अतिवृष्टीमुळे आपत्ती निर्माण झाली तर त्या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव ओ. पी. गुप्ता यांनी दिले. जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकामी आढावा बैठक श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली.यावेळी श्री. गुप्ता बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, महावितरणचे गौतम गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 172 गावे पूर प्रवण आहेत. या गांवामध्ये भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देवून श्री. गुप्ता म्हणाले, रस्त्यांवर दरड कोसळल्याने गावांचा संपर्क तुटतो यावेळी स्थानिक नागरिकांच्या सहभागाने रस्त्यावरील दरड तात्काळ हटवावी. पेरणी होण्याच्या अगोदर शेतातील पाणी निचरा होण्यासाठी ओढ्या-नाल्यांची साफसफाई करावी. ज्या गावांचे कायमचे पुनर्वसन करावयाचे आहे त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल.

पावसाळी हंगामात साथीचे रोग पसरु नयेत म्हणून आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी. ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालयांना ज्या स्त्रोतातून पाणी पुरवठा होते त्या स्त्रोतांची तपासणी करावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण केले जाते त्याचीही तपासणी करावी. अति पावसामुळे नदी व ओढ्यांच्या पुलावरुन पाहणी वाहत असेल तर पुलांवरुन होणारी वाहतूक थांबवावी. विज पुरवठा खंडीत होणार नाही याची महावितरणने खबरदारी घ्यावी. तसेच महावितरण कार्यालयात नागरिकांच्या मदतीसाठी अधिकारी, कर्मचारी यांची 24 तास सेवा लावावी. खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांना पावसातही रस्ता दिसण्यासाठी ठळक पद्धतीने दिशादर्शक लावावे.

आपत्ती संदर्भात नागरिकांकडून मदती संदर्भात मागण्या आल्या तर त्या पूर्ण करा, असे निर्देश देवून श्री. गुप्ता यांनी जिल्ह्यातील झालेली पेरणी, आत्तापर्यंत झालेला पाऊस, आपत्ती संदर्भात करावयाच्या उपाययोजना, साथ रोग पसरु नये म्हणून औषधसाठ्यांचा आढावाही त्यांनी या बैठकीत घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संभाव्य आपत्ती संदर्भात करावयाच्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Leave a Comment