पत्नीवरील चारित्र्याचा संशय चिमुकलीच्या जीवावर बेतला; क्षणात कुटुंब उद्धवस्त

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये औसा तालुक्यातील एका पित्याने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पाण्याच्या हौदात बुडवून हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

हि घटना औसा तालुक्यातील आशिव याठिकाणी घडली आहे. हत्या झालेल्या मुलीचे नाव सृष्टी संतोष भोंडे असे असून ती दीड वर्षांची होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील संतोष गंगादास भोंडे याला अटक केली आहे. आरोपी बापाला दारुचे व्यसन आहे. मागच्या काही दिवसांपासून तो पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला होता. दारूच्या पैशासाठी तो नेहमी आपल्या पत्नीसोबत आणि वडील गंगादास भोंडे यांच्यासोबत भांडण करायचा. त्याचबरोबर आरोपी भोंडे पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा.

शुक्रवारी आरोपीने पत्नी आणि वडिलांसोबत किरकोळ कारणावरून वाद उकरून काढला. यामुळे पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. यामुळे संतापलेल्या संतोषने बायकोचा राग आपल्या मुलीवर काढला. त्याने घरातील पाण्याच्या हौदात दीड वर्षाच्या मुलीला टाकले. कुटुंबीयांना काही कळायच्या आत चिमुकलीच्या नाका-तोंडात पाणी शिरून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीचे वडील गंगादास भोंडे यांच्या तक्रारीवरुन संतोष गंगादास भोंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वडील संतोष भोंडेला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना लिंगे करत आहेत.