साक्षरतेमध्ये केरळ अव्वल क्रमांकावर, तर महाराष्ट्राने पटकावला ‘हा’ क्रमांक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात साक्षरतेमध्ये याही वेळेस केरळ राज्य आघाडीवर आहे. केरळने साक्षरतेमध्ये पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भातील रिपोर्ट जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, दक्षिणेकडील आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे. याशिवाय साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या ५ राज्यात स्थान मिळवू शकलेला नाही. महाराष्ट्र या यादीत ६व्या स्थानावर आहे.

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भातील रिपोर्टनुसार, केरळने साक्षरतेमध्ये पहिले स्थान कायम राखले आहेच पण त्याचबरोबर पुरुष आणि महिला साक्षरतेमधील अंतर अवघे २.२ टक्के आहे. केरळमध्ये ९७.४ टक्के पुरुष तर ९५.२ टक्के साक्षर महिला आहेत. संपूर्ण देशभरातील पुरुष आणि महिला साक्षरतेची आकडेवारी लक्षात घेतली तर १४.४ टक्के अंतर आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. पुरुष ८४.७ टक्के तर ७०.३ टक्के महिला साक्षर आहेत.

दरम्यान, साक्षर राज्यांच्या यादीत महाराष्ट्र ६व्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात एकूण साक्षरतेचे प्रमाण ८४.८ टक्के आहे. पुरुष आणि महिला साक्षरतेच्या प्रमाणात तब्बल १२.३ टक्क्यांचे अंतर आहे. पुरुष ९०.४ टक्के तर महिला ७८.४ टक्के साक्षर महिला आहेत. पहिल्या ५ सर्वाधिक साक्षर राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांचा नंबर लागतो तर साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या शेवटच्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश,तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत.

आंध्र प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण ६६.४ टक्के आहे. बिहारपेक्षाही आंध्र प्रदेश साक्षरतेमध्ये मागे आहे. बिहारमध्ये साक्षरतेचे प्रमाण ७०.९ टक्के आहे. देशात साक्षरतेचे राष्ट्रीय सरासरीचे प्रमाण ७७.७ टक्के आहे. तेलंगण ७२.८ टक्क्यांसह राष्ट्रीय सरासरीतही मागे आहे. आसाममध्ये साक्षरतेचे प्रमाण ८५.९ टक्के, उत्तराखंडमध्ये ८७.६ टक्के आणि कर्नाटकात ७७.२ टक्के आहे. उत्तराखंड ८७.६ टक्क्यांसह साक्षरतेमध्ये केरळ आणि दिल्लीच्या खालोखाल तिसऱ्या स्थानावर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.