नविन मालखेडमध्ये मध्यरात्री तीन ठिकाणी घरफोड्या, चोरट्यांचा सोन्यावर डल्ला

कराड | तालुक्यातील नवीन मालखेड येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. घरफोडीत एका कुटुंबाचे 62 हजार 400 रुपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन मालखेड येथील पूनम अजय ओव्हाळ यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, नवीन मालखेडमधील समाज मंदीराजवळ माझे घर आहे. काल रात्री त्यांचे पती नोकरीसाठी गेले. त्यानंतर त्या, त्यांची आजी सासू गंगूबाई, मुलगा उत्कर्ष, सासू रंजना या घरी झोपल्या होत्या. मध्यरात्री तीनच्या सुमारास दरवाजाचा आवाज आल्याने पूनम ओव्हाळ यांना जाग आली. त्यावेळी दरवाजाजवळ त्यांना दोन चोरटे दिसल्याने त्यांनी सासूबाईना आवाज दिला. त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर ओव्हाळ यांनी खात्री केली असता घरातील पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने चोरट्यांनी चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, शेजारच्या शहाबाई ओव्हाळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून त्यांच्याही घरात चोरट्यांनी हात साफ केला. त्याचबरोबर अरुण ओव्हाळ यांच्या घरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ओव्हाळ यांच्या फिर्यादीवरुन दोन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करत आहेत.

You might also like