नवी दिल्ली । देशात इंधन दर वाढीचा भडका अजून शमला नाही आहे. देशभरात आज (बुधवार) पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरात १७ पैसे ते २० पैसे अशी वाढ झाली असून डिझेलच्या दरात ४७ ते ५५ पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर हा ८६.८५ रुपये तर डिझेलचा दर ७७.४९ रुपये इतका झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे. देशातील ही पहिलीच घटना आहे. आजच्या दरवाढीनुसार, देशातील महानगरांमधील दरवाढ अशी, दिल्ली (पेट्रोल – ७९.७६, डिझेल -७९.८८), मुंबई (पेट्रोल – ८६.५४, डिझेल-७७.७६), चेन्नई (पेट्रोल – ८३.०४, डिझेल-७६.७७), कोलकाता (पेट्रोल – ८१.४५, डिझेल-७४.६३) इंधनाचा दर आहे.
म्हणून पेट्रोल-डिझेलच्या दरात होते दरोरोज वाढ
भारतात आता पेट्रोल-डिझेलच्या सुधारित किंमती दररोज सकाळी ६ वाजता जाहीर होतात. जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती या मिनिटामिनिटाला बदलत असतात. त्याचा थेट परिणाम इंधनाचे वापरकर्ते आणि डिलर्स यांच्या खरेदी किंमतीत होत असतो. भारतातील या इंधनाच्या किंमतींमध्ये उत्पादन शुल्क, व्हॅट, डिलर्सचं कमिशन या बाबींचा समावेश असतो. राज्यांप्रमाणे या करांमध्ये बदल होत असल्याने इंधनाच्या दरांतही बदल दिसून येतात. हे तीनही कर पेट्रोल-डिझेलच्या मूळ दरात समाविष्ट झाल्याने त्यांची किरकोळ विक्रीची किंमत जवळपास दुप्पट होते. त्याचबरोबर रुपयाच्या मुल्याचा डॉलरच्या तुलनेत झालेला बदलही इंधनाच्या किंमतींवर परिणाम होतो. त्यामुळे डॉलरच्या दरात आंतराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा दर वाढल्यास भारतातही इंधनाच्या दरात वाढ होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”