सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
पिंपोडे बुद्रुक येथे येथे पंक्चरचे दुकान व गॅरेजला आग लागून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. बसस्थानक परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही दुकाने बंद असल्याने जीवितहानी टळली. आगीमध्ये जुने टायर, हवा भरण्याचा कॉम्प्रेसर जळून खाक झाले. याच दुकानास लागून असलेले दुचाकीचे गॅरेजही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यामध्ये दोन दुचाकी जळून खाक झाल्या असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील बस स्टँडच्या पाठीमागील बाजूस वाईकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिमेला गेल्या अनेक वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये गाड्यांच्या टायर पंक्चर काढण्याचे दुकान व लगतच गॅरेज आहे. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानातून धुराचे लोट बाहेर लागले. मात्र, सुदैवाने इतर दुकाने या दुकानांपासून काही अंतरावर असल्याने मोठे नुकसान टळले.
घटनास्थळी जमलेल्या युवकांनी छोट्या मोटरच्या साहाय्याने पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, टायर पेटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे युवकांचे प्रयत्न अपुरे पडत होते. दुकानात असलेले टायर व इतर साहित्य, तसेच गॅरेजमध्ये दुरुस्तीला आलेल्या दोन दुचाकी जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सातारा नगरपालिकेचा बंब आल्यानंतर आग पूर्णपणे विझविण्यात आली. जवळच भुसारमालाचे मोठे दुकान आहे. बाजूला दुकानांची रांगच आहे. मात्र, युवकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली.