हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रस्त्यावर अपघाताच्या समस्या प्रचंड वाढल्या असून, यातील कित्येक अपघात हे हेल्मेट न वापरल्यामुळे होतात. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) शोरुम मालकांना पत्राद्वारे एक आदेश जारी केला आहे. पुण्यात आता दुचाकी खरेदी करताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे शोरुम्ससाठी बंधनकारक करण्यात आले आहे. हा महत्वाचा निर्णय रस्त्यावर होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. तर चला याबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
RTO कार्यालयाकडून आदेश जारी –
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, नव्याने दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना शोरुमकडून दोन हेल्मेट (helmets) देण्यात यावी. केंद्र सरकारच्या मोटार वाहन नियम 1989 अंतर्गत, हा नियम लागू केला आहे. रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. जर वाहनचालक व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर केला तर या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे नव्या दुचाकी खरेदीवेळी वितरकाने ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे, असे आरटीओच्या आदेशात सांगण्यात आले आहे.
काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा –
हेल्मेट खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रथम, नेहमी ISI ( Indian Standards Institute) मार्क असलेले ब्रँडेड हेल्मेटच निवडा. अशा हेल्मेट्समध्ये गुणवत्ता आणि सुरक्षा याची खात्री असते, जे स्वस्त आणि नॉन-ब्रँडेड हेल्मेट्समध्ये नसते. दुसरे म्हणजे, हेल्मेटचा आकार योग्य निवडणे महत्त्वाचे आहे. डोक्याच्या आकारानुसार आणि आरामदायक फिटिंगसाठी हलके आणि मजबूत हेल्मेट निवडावे. त्याने वापरणाऱ्याला अधिक आरामदायक वाटेल आणि सुरक्षा देखील वाढेल. तसेच हेल्मेटची नियमित देखभाल करा. वायजरवर कॅक किंवा ओरखडे पडले असल्यास ते बदलणे आवश्यक आहे. खराब वायजरमुळे स्पष्टता कमी होते, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. या सर्व गोष्टींचा विचार करूनच हेल्मेट खरेदी करा आणि सुरक्षित राहा.