सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यातील मटकाकिंग समीर सलीम शेख (रा. मोळाचा ओढा, सातारा) याने जिल्हा व सत्र न्यायालयात कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली. समीर शेख यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांनी फिर्याद दिली असून भादवि 353 नुसार गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, समीर शेख याचा मुलगा साहील यास शाहूपुरी पोलिसांनी एका गंभीर गुन्ह्यात अटक केली होती. शुक्रवारी त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बरकडे यांच्यासह अंमलदार जयवंत घोरपडे व अन्य कर्मचारी गेले होते. संशयिताला घेवून पोलीस कोर्ट हॉलबाहेर थांबले असताना समीर शेख त्याठिकाणी आला. त्याने संशयिताला पाण्याची बाटली देण्याचा प्रयत्न केला, यावेळी घोरपडे यांनी त्यास अटकाव केला.
यावेळी शेख याने दंगा करत घोरपडे यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. पोलीस दलातील मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावे घेवून ते माझ्या ओळखीचे असल्याने तू माझे काही करू शकत नाही, असा दम त्याने दिला. त्यानंतर शेख हा न्यायालयात असलेल्या पोलिसांच्यासमोरून गायब झाला. या प्रकारानंतर घोरपडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून दि.28 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू माने तपास करत आहेत.