Tuesday, June 6, 2023

सातारा जिल्ह्यातील 397 एसटी कर्मचारी निलंबित तर 95 जणांची सेवा समाप्ती

सातारा | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. सातारा विभागातील 11 आगारातील सुमारे 397 कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले असून आजपर्यंत 95 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

सातारा विभागातील विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा तसेच अकरा आगारातील सोमवारी 397 कर्मचारी आत्तापर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. तसेच आजपर्यंत 95 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आजपर्यंत 920 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे सातारा विभागात विविध मार्गावर सुमारे 135 बस धावल्या असल्याची माहिती विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचा ८ नोव्हेंबर पासून संप सुरू आहे. कर्मचारी व एसटी महामंडळ यांच्यामध्ये वारंवार बैठका होत आहेत. मात्र बैठकामध्ये चर्चा होवून विविध प्रश्नावर मार्ग काढला जात आहे. मात्र कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. त्यामुळे अन्य संघटनांचे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सातारा विभागातील ११ आगारामध्ये लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील फेल्या काही प्रमाणात सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही पूर्ण क्षमतेने एसटीच्या फेऱ्या सुरू न झाल्याने शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह प्रवाशांचे हाल होत आहेत.