हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बदलत्या काळाबरोबर मिळणाऱ्या संधी आणि शिक्षण यामुळे स्त्री वर्ग सक्षम होत आहे, पण आत्मभानाचा विचार अधिक विकसित व्हायला हवा असे प्रतिपादन आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन च्या प्राचार्या डॉ. वंदना नलावडे यांनी केले. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात महिला विकास कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस.एस.पवार , कला शाखेच्या उपप्राचार्य व महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. सुनिता घार्गे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. मंदाकिनी वर्णेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रतिभा घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला आरक्षण, शासनाची महिला सबलीकरणाची धोरणे त्याचबरोबर शिक्षणाच्या संधी यामुळे महिला सक्षमीकरण होत असले तरी स्वतंत्रपणे विचार करणे आणि आत्मभान जागे असणे यासाठी स्त्रीवर्गाने अधिक सजग असले पाहिजे असे मत प्राचार्या डॉ. नलावडे यांनी मांडले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी स्त्रीची स्वतंत्र निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. जागतिक पातळीवर नव्वदच्या दशकात झालेल्या स्त्रीवादी चळवळींचा मोठा परिणाम शहरी स्त्री वर्गावर झाला आहे, परंतु ग्रामीण भागातील स्त्रीचे प्रश्न आजही धीम्या गतीनेच मार्गी लागत आहेत. त्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थिनींनी स्त्री जीवनाचे प्रतिबिंब दर्शविणारी ‘पैसे’ ही एकांकिका सादर केली. यावेळी महाविद्यालयातील व समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
इतिहास विभागाच्या वतीने सैन्यदलात शौर्य दाखविलेल्या महिलांच्या जीवनावर आधारित ‘इंदिरा’ या भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. सुनिता घार्गे यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. मंदाकिनी वर्णेकर यांनी करून दिला तर प्रा. स्नेहा धनवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्मिता कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थिनी वर्ग व सातारा परिसरातील महिला वर्गाने हजेरी लावली होती.