अखेर पाकिस्तानने घेतलं नमतं; कुलभूषण जाधव यांना भेटण्याची दिली परवानगी

इस्लामाबाद । हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी पाकिस्ताननं दिली आहे. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना कुठल्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. त्यानुसार इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला भेटीसाठी ४ वाजताची वेळ देण्यात आली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये २० जुलै फेरविचार याचिका दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्याआधी ही परवानगी द्यावी असे भारताने म्हटले होते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. कुठल्याही अर्टी-शर्थीविना भेटण्याच्या परवानगीशिवाय पाकिस्तानने चर्चेसाठी इंग्रजी भाषेची सक्ती करु नये, अशी मागणी सुद्धा भारताने केली आहे.

कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात असून हेरगिरीच्या खोटया आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली आहे. आयसीजेच्या निकालानुसार, काऊंन्सलर अ‍ॅक्सेस तसेच मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी पूर्व अट असल्याची भारताने पाकिस्तानला आठवण करुन दिली आहे. मागच्या आठवडयात कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. भारतानं याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.

“कुलभूषण जाधव प्रकरणातील एफआयआर, पुरावे, न्यायालयाच्या आदेशासह कोणतीही संबंधित कागदपत्रे भारताला देण्यास पाकिस्तानने नकार दिला. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान आयसीजेच्या निर्णयाचे पालन करण्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.