Thursday, October 6, 2022

Buy now

बहिणीच्या लग्नाआधीच नियतीने साधला डाव, नाशिकमध्ये शेतकरी भावाचा दुर्दैवी अंत

चांदवड : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रूक याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका कुटुंबात बहिणीच्या लग्नाची लगबग सुरू असतानाच भावावर नियतीने डाव साधला आहे. यामध्ये अंगावर वीज कोसळून संबंधित तरुणाचा तडफडून मृत्यू झाला आहे. घरात लग्नाची लगबग सुरू असताना नवरीच्या भावाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने लग्न घरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कैलास कवडे असं मृत पावलेल्या भावाचे नांव असून ते चांदवड तालुक्यातील बुद्रूक येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी बुधवारी सायंकाळी चांदवड परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी आकाशात मोठ्या प्रमाणात विजांचा गडगडाट होत होता. यावेळी मृत कैलास कवडे हे आपल्या शेतातील कांदा झाकण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली अन् एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यांचा अंगावर वीज कोसळून शेतातच तडफडून मृत्यू झाला. कैलास कवडे यांच्या मृत्यूची माहिती समोर येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

अवघ्या सात दिवसांवर मृत कैलास कवडे यांच्या बहिणीचे लग्न असताना अशाप्रकारे भावाचे निधन झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मृत कैलास कवडे यांच्या बहिणीचे 16 मार्च रोजी लग्न होणार होते. त्यांच्या माघारी एक भाऊ, बहीण, आई वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.