बंगालमध्ये भाजपला किती जागा मिळणार? प्रशांत किशोर यांचा खळबळजनक दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता । पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. ममता बॅनर्जी यांचे खंदे समर्थक आणि तृणमूल काँग्रेसचे मोठे नेते भाजपवासी होत आहेत. अशावेळी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजपबद्दल मोठा दावा केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप 2 आकडी संख्याही गाठू शकत नसल्याचं भाकीत किशोर यांनी केलं आहे. (In West Bengal BJP will not be able to reach double digits, claims Prashant Kishor) ‘माध्यमातील एक वर्ग भाजपला समर्थन मिळण्यासाठी वातावरण निर्मिती करत आहे. वास्तवात पश्चिम बंगालमध्ये भाजप दोन आकडी संख्येसाठी संघर्ष करेल. कृपया हे ट्वीट सेव्ह करुन ठेवा. भाजपनं यापेक्षा चांगलं प्रदर्शन केलं तर मी हे काम सोडून देईन’, असं ट्वीट करुन प्रशांत किशोर यांनी मोठा दावा केला आहे.

दरम्यान, 19 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा मेदिनीपूर इथं पार पडली. या सभेदरम्यान तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री शुभेंद्र अधिकारी यांच्यासह 11 आमदार, 1 खासदार आणि एका माजी खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्याचा भाजपचा मनसुबा स्पष्ट दिसू लागला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय, हैदराबाद महापालिका निवडणूक आणि केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला आहे.

ममता बॅनर्जी प्रशांत किशोर यांच्यावर नाराज?
तृणमूल काँग्रेसचे अनेक मंत्री, आमदार भाजपवासी होत असल्यानं ममता बॅनर्जी चांगल्याच अस्वस्थ झाल्याचं कळतंय. नेत्यांना थांबवणं ममता बॅनर्जी यांना शक्य नसल्याचं दिसून येत आहे. अशावेळी ममता बॅनर्जी प्रशांत किशोर यांच्यावर नाराज असल्याचंही बोललं जात आहे.

कैलास विजयवर्गीयांचा प्रशांत किशोर यांना टोला
भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी प्रशांत किशोर यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये भाजपची त्सुनामी सुरु आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला एका निवडणूक रणनितीकाराला गमवावा लागेल’, असा चिमटा विजयवर्गीय यांनी काढलाय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment