पुणे प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अन्य पक्षांतील आमदार व खासदार यांना फोडत आपल्या पक्षात सामील करत तिकीट वाटपाचा धडाकाच लावला होता. भाजपच्या मेगाभरतीवर जेव्हा टीका होत होती त्यावेळी आमच्याकडं वॉशिंग मशीन आहे, असं म्हणण्यापर्यंत भाजपच्या नेत्यांची मजल गेली होती. मात्र, निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं आणि सत्ता हातची गेल्यानंतर आता भाजपचे नेते चिंतन करू लागले आहेत. त्यातून पक्षातील मेगाभरतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपलं प्राजंळ मत व्यक्त करत मेगाभरती ही आमची चूक होती असं कबूल केलं आहे.
”भाजपमध्ये काही मागावं लागत नाही. पक्षासाठी काम करणाऱ्यांना आपोआप मिळतं. ही भाजपची संस्कृती आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या मेगाभरतीमुळं ही संस्कृती कुठंतरी ढासळली. मेगाभरती ही चूकच होती,” अशी जाहीर कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांचा रोख नेमका कुणावर होता, याबाबत आता भाजपच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान ‘ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षाचे नेते आपल्या पक्षात घ्यावे लागतात, असा फडणवीस यांचा दावा होता. मात्र, तो फोल ठरल्याचं निकालानंतर समोर आलं,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेगाभरतीचा निर्णय कसा चुकीचा होता यावर आपलं मत प्रकट केलं.