हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या पुणे (Pune) शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच GBS या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे आरोग्य विभागाने सतर्कतेचे आदेश जारी केले आहेत. तसेच, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जीबीएस म्हणजे काय?
गुईलेन बॅरे सिंड्रोम हा ऑटोइम्युन विकार असून, तो बहुतेकदा व्हायरल इन्फेक्शननंतर काही आठवड्यांत दिसून येतो. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या स्नायूंवर हल्ला करते. ज्यामुळे हातपायांना अशक्तपणा येतो आणि रुग्णांना गिळण्यास किंवा श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. परंतु, योग्य उपचार आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे बरेच रुग्ण काही दिवसांतच पूर्णपणे बरे होतात.
पुण्यात वाढती रुग्णसंख्या
पुणे शहरात जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्यात तज्ज्ञांचे पथक पाठवले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यास मदत करणार आहे. सध्या पुण्यात शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुणे शहरात आतापर्यंत 15 रुग्ण आढळले आहेत.
जीबीएस टाळण्यासाठी काय करावे?
जीबीएस हा वेळेवर उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी शरीरातील लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, हातपायात अचानक अशक्तपणा जाणवणे, चालताना अडथळा येणे किंवा स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे ही लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
इतकेच नव्हे तर, दूषित पाणी आणि अशुद्ध अन्नामुळे संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे पाणी उकळून व गाळून प्यावे, उघड्यावरचे आणि शिळे अन्न खाणे टाळावे. लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
प्रशासनाकडून उपाययोजना
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरच आरोग्य विभागाने खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहिमा राबविण्यात येत आहेत. तसेच, रुग्ण ओळखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करणाऱ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.