लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ओली पोपला बोल्ड करत बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये 100 विकेटचा टप्पा पार केला आहे. ओव्हल टेस्टच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात बुमराहने रिव्हर्स स्विंगच्या मदतीने इंग्लंडच्या बॅटिंगची वाट लावली. त्याने पहिले पोपला आणि मग जॉनी बेयरस्टोला आपल्या रिव्हर्स स्विंगच्या जोरावर बोल्ड केलं.
बुमराह टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा भारतीय फास्ट बॉलर ठरला आहे. आपल्या 24 व्या टेस्टमध्येच त्याने हि कामगिरी केली आहे. याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी 25 टेस्टमध्ये 100 विकेट मिळवल्या. तर इरफान पठाणने 28, मोहम्मद शमीने 29, जवागल श्रीनाथने 30 आणि इशांत शर्माने 33 टेस्टमध्ये 100 विकेटचा टप्पा पार केला होता.
जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे हा सामना इंग्लंडच्या हातातून निसटत चालला आहे. पहिल्या सत्रात दोन विकेट मिळवल्यानंतर भारताने दुसऱ्या सत्रात चार विकेट मिळवल्या आणि सामना आपल्या बाजूने खेचला. जर ओव्हल टेस्टमध्ये विजय झाला तर टीम इंडिया 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेईल. या सीरिजची पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला, तर तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने पुनरागमन करत भारतावर विजय मिळवला होता. या सीरिजची पाचवी टेस्ट 10 सप्टेंबर रोजी मॅनचेस्टर या ठिकाणी होणार आहे.