Saturday, March 25, 2023

‘ICC’ने भारतीय संघाला ठोठावला दंड; हे आहे कारण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावा करून देखील भारताचा ४ विकेटनी पराभव झाला. दरम्यान, या पराभवाबरोबरच भारतीय संघाला आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे.

या कारवाईनुसार आयसीसीने भारतीय संघाला सामन्यातील मानधनाच्या ८० टक्के इतका दंड ठोठावला आहे. पहिल्या वनडेत धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दलची चूक कर्णधार विराट कोहलीने मान्य केली असून याप्रकरणाची सुनावणी होणार नसल्याचे आयसीसीने सांगितले. न्यूझीलंड दौऱ्यावर धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल भारतीय संघाला दंड होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी टी-२० मालिकेत दोन वेळा भारतीय संघाला याच कारणासाठी दंड झाला होता.

- Advertisement -

या नियमामुळं भारतीय संघाला केला दंड
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या वनडे सामन्याचे आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी भारतीय संघाला निश्चित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल दंड केला. भारतीय संघाने नियमीत वेळेपेक्षा ४ षटके अधिक वेळ घेतला. आयसीसीचा नियम २.२२ नुसार निश्चित वेळेनंतर जितकी षटके टाकली जातात अशा प्रत्येक ओव्हरसाठी २० टक्के दंड केला जातो.