हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्राइस्टचर्च येथे खेळल्या जाणार्या दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडलने भारताला पहिल्या डावात २४२ धावांत गुंडाळले आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारतासाठी पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीने अर्धशतक ठोकले. मात्र, २१६ धावांवर नऊ गडी गमावलेल्या भारतीय संघासाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी २६ धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या २४२ पर्यंत पोहोचवली. न्यूझीलंडच्या काइल जेमीसनने १४ षटकांत केवळ २५ धावा देऊन भारताचे ५ गडी टिपले. त्यांच्याखेरीज टीम साऊथी आणि ट्रेंट बाउल्ट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दिवसअखेर प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावात विकेट न गमावता ६३ धावा केल्या. न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडेलच्या सलामी जोडीच्या खेळीने किवी संघ भारताच्या केवळ १७९ धावांनी मागे आहे.
दरम्यान, आज पहिल्या सत्रात भारताने मयंक अग्रवाल (७) आणि शॉच्या विकेट गमावल्या. दुसर्या सत्रात कर्णधार विराट कोहली (३) आणि अजिंक्य रहाणे (७) आल्या पावली पॅव्हिलियनमध्ये परतले. त्यानंतर पुजारा आणि विहारीने पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. एका वेळी भारताची धावसंख्या एका विकेटसाठी ८० अशी होती. मात्र लंच नंतर काही क्षणात भारताची अवस्था ४ विकेट्सवर ११३ धावा अशी झाली. त्यानंतर पुजारा आणि विहारी यांनी जबाबदारी उचलत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयन्त केला. पुजाराने पहिल्या डावात ६ चौकार लगावले तर विहारीने १० चौकार ठोकले. विहारीने नील वॅग्नर (२९ चेंडूंत १ विकेट) च्या शॉर्ट पिच बॉलवर पलटवार करत चांगला प्रहार केला परंतु चहाच्या अगदी आधी तो अशाच एका चेंडूवर बाद झाला.
हनुमा विहारी बाद झाल्यानंतर पुजारा काईल जेमिसनचा बळी ठरला. पुजाराने १४० चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. यानंतर मात्र, भारताचा डाव पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळला. ऋषभ पंत (१२), रवींद्र जडेजा (९) आणि उमेश यादव (०) हे तिघेही जॅमीसनचा बळी ठरले. शेवटच्या विकेटसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी संघर्षपूर्ण २६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताचा डाव २४२ पर्यंत नेला. यावेळी शमीने १ षटकार आणि १ चौकार लगावला.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.