सातारा जिल्हा रूग्णायलयातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | चतुर्थश्रेणी संवर्गातील काही कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करून फरकासह वेतन मिळावे, कर्मचार्‍यांच्या अंतर्गत पदोन्नतीचा निर्णय तात्काळ घ्यावा. अनुकंपावरील चालू वर्षातील नेमणुका तात्काळ करण्यात याव्या, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी संघटनेस सर्व मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या गोष्टीला एक महिना होवून गेला. मात्र, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मागण्या सोडवण्यास टाळाटाळच केली आहे. त्यासाठी दि. 24 ऑगस्ट रोजी एक दिवसांचे धरणे आंदोलन करुन 30 रोजीपासून संघटनेने बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.

सोमवारी संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा चव्हाण, कार्याध्यक्ष विष्णू नलवडे, खजिनदार चंद्रकांत जाधव, सरचिटणीस प्रकाश घाडगे यांच्यासह संघटनेच्या इतर पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची पिळवणूक थांबवून तातडीने न्याय न दिल्यास हे आंदोलन असेच सुरु राहील, असे सुरेखा चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सकांची स्पष्टोक्ती

दरम्यानच्या कालावधीत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांची भेट घेतली, तरीही प्रश्न मार्गी न लागता टोलवाटोलवीच झाली. २५ ऑगस्टच्या भेटीत डॉ. चव्हाण यांनी कर्मचारी माझे ऐकत नाहीत. मी प्रश्न मार्गी लावू शकणार नाही, अशी स्पष्टोक्ती दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठविले होते. आजपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली.

Leave a Comment