वृत्तसंस्था । मागील काही दिवसापासून भारत-चीनमध्ये सीमावादवरून तणाव आहे. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांदरम्यान हिंसक संघर्ष झाला. या संघर्षामध्ये भारतीय सैन्यात २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे देखील जवळपास ४० सैनिक मारले गेले. त्यांनतर सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सीमेवर तणाव असाच वाढत राहिला तर भारताला चीन, पाकिस्तान आणि नेपाळ या तिन्ही देशांकडून लष्करी दबावाचा सामना करावा लागेल असा इशारा ग्लोबल टाइम्समधल्या लेखातून देण्यात आला आहे.
ग्लोबल टाइम्स हे चीनमधल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाल्यापासून सातत्याने ग्लोबल टाइम्समधून भारताला धमक्या, इशारे दिले जात आहेत. शांघाय अॅकेडमी ऑफ सोशल सायन्समधील आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक हू झीहायाँग यांच्या विधानाचा संदर्भ लेखामध्ये देण्यात आला आहे.
“भारताचा एकाचवेळी चीन, पाकिस्तान आणि नेपाळ बरोबर सीमावाद सुरु आहे. पाकिस्तान हा चीनचा विश्वासू रणनितीक सहकारी आहे. नेपाळ बरोबरही चीनचे घनिष्ठ संबंध आहेत. हे दोन्ही देश चीनच्या प्रस्तावित बॉर्डर अँड रोड प्रकल्पातील भागीदार आहेत. भारताने सीमावाद वाढवला तर त्यांना एकाचवेळी दोन किंवा आघाडयांवर दबावाचा सामना करावा लागेल. हे भारताच्या लष्करी क्षमतेपलीकडे असून त्यांचा मोठा पराभव होईल” असे हू झीहायाँग यांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्समधल्या लेखात म्हटले आहे. ”सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा चीनचा कुठलाही हेतू नाही. गलवान खोऱ्यात जी घटना घडली त्याला भारताच जबाबदार आहे” असे हू झीहायाँग यांनी ग्लोबल टाइम्सशी बोलताना सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”