हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदींना मीडियाने मोठा नेता बनवलं पण त्यांच्या हातात आपला देश सुरक्षित नाही. खरं तर मोदींचा लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाहीये असे म्हणत काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) सडकून टीका केली आहे. हॅलो महाराष्ट्राच्या विशेष पॉडकास्ट मध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी देशातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आपला देश नरेंद्र मोदींच्या हातामध्ये सुरक्षित नाही. पाकिस्तानात गालवानमध्ये आपली माणसं मारली, आज हजारो स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात आहे आणि तुम्ही म्हणताय नाही काही, पाकिस्तान म्हणतंय कि आम्ही तुमची सहा विमाने पाडली आणि तुम्ही म्हणताय आम्ही सांगणार नाही काय झाले ते. पराभव झाला तर हे सुद्धा सांगता यायला हवे. चुका झाल्या तर त्या मान्य करून पुढे जायचं असतं पण मोदींची प्रवृत्तीची कुठल्याही पंतप्रधानांशी तुलना न करता येण्यासारखी आहे. मुळात त्यांची लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाहीये.
“पाकिस्तासोबतचं युद्ध मीडियातून लढलं गेलं. यात भारताचा स्पष्ट पराभव झाला. काही गोदी मीडियाच्या चॅनल्सने अशा प्रकारे अतिरंजित बातम्या रंगवल्या..कराची उध्वस्त केले, इस्लामाबाद कॅप्चर केले, मुनीरला पकडून आणलाय. यामुळे भारताची क्रेडिबिलिटी संपली. आज पाकिस्तानची क्रेडिबिलिटी आपल्यापेक्षा जास्त आहे हे फक्त गोडी मीडियाच्या चॅनल्समुळे. त्यावर तुम्ही काही कारवाई करणार आहेत कि नाही? मोदींना मीडियाने मोठा नेता बनवलं पण मोदींचं खरं स्वरूप देशासमोर कधी येईल असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. एक देश एक निवडणूक, एक देश एक टेक्स आणि एक देश एक नेता हि कन्सेप्ट कुठून आली तर हे हिटलरच्या प्रेरणेतून आलेले आहे असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
दरम्यान, भाजपला या देशात पुन्हा वर्णाश्रमावर आधारित व्यवस्था आणायची आहे. फुले, शाहू, आंबेडकरांनी जी क्रांती केली ती संपवून टाकायची आहे. ज्या व्यवस्थेमुळे जो देश हजारो वर्ष पारतंत्र्यात होता, ज्या व्यवस्थेने माणसाला शिक्षणापासून वंचित ठेवलं, विज्ञानापासून वंचित ठेवलं आणि आपण गुलामगिरीत गेलो ती व्यवस्था संविधान आल्यानंतर बदलली. मात्र भाजपला पुन्हा हजारो वर्ष जुनी गुलामगिरी आणायची आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्राच्या पॉडकास्ट मध्ये बोलताना व्यक्त केले.