Wednesday, October 5, 2022

Buy now

भारताने रचला इतिहास, कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध लढाई सुरू असतानाही या लढाईत भारताने एक इतिहास रचण्याचे काम केले आहे. लसीकरण मोहिमेत देशाने एक महत्त्वाच्या टप्पा गाठला आहे. आज देशात कोरोना लस घेणाऱ्यांच्या संख्येने 100 कोटींचा आकडा पार केला. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 100 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून एकूण 39 कोटी 25 लाख 87 हजार 450 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 11 कोटी 01 लाख 73 हजार 456 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. याबाबत अधिक सांगायचे झाले तर आज भारताने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. कोरोनाच्या या महामारीत एकेकाळी लसीही उपलब्ध नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले.

लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे. 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे. देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

असे आहेत लसीकरणाचे टप्पे –

16 जानेवारी 2021- लसीकरण सुरु
1 फेब्रुवारी 2021- 1 कोटी डोस
15 जून 2021 – 25 कोटी डोस
6 ऑगस्ट 2021 – 50 कोटी डोस
1 सप्टेंबर 2021- 75 कोटी डोस
21 ऑक्टोबर – 100 कोटी डोस