तिसऱ्या कसोटीत विजयापासून भारत फक्त एक पाऊल दूर
नॉटिंगहम, इंग्लंड| भारत व इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाचं उत्तम प्रदर्शन घडवत भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे. पहिल्या डावातील १६८ धावांच्या मजबूत आघाडीवर भारताच्या दुसऱ्या डावातील ३५२ धावांनी कळस रचला. विजयासाठी ५२१ धावांच लक्ष घेऊन उतरलेल्या इंग्लंड संघाला सुरुवातीलाच दणके देण्याचं काम ईशांत शर्मा,जसप्रीत बुमराह व मोहम्मद शामी यांनी केलं. ४ बाद ६२ अशा भीषण अवस्थेतून संघाला बाहेर काढण्याच काम जॉस बटलर व बेन स्टोक्स यांनी केलं.
बेन स्टोक्सने ६२ तर जॉस बटलरने १०६ धावांची खेळी करत भारताचा विजय लांबविला. दिवसाच्या दुपारच्या सत्रात हतबल वाटणारी भारतीय गोलंदाजी नवा चेंडू घेतल्यानंतर अधिक बहरली. जसप्रीत बुमराहने अप्रतिम स्पेल टाकत भारताचा विजय दृष्टीक्षेपात आणला. चौथ्या दिवसअखेर इंग्लंड संघाच्या ९ गडी बाद ३११ धावा झाल्या असून पाचव्या दिवशी त्यांना अजून २१० धावांची आवश्यकता आहे. भारतातर्फे हार्दिक पांड्याने पहिल्या डावात तर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवण्याची किमया केली आहे. शेवटच्या दिवशी भारत किती लवकर विजय मिळवतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.