Saturday, March 25, 2023

भारतात पुन्हा वाढला बेरोजगारीचा दर; जाणून घ्या यामागची खरी कारणे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. भारतदेखील याला अपवाद राहिलेला नाही. कमी झालेल्या मागणीमुळे देशात कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतातील बेरोजगारीचे प्रमाण हे गेल्या पाच आठवड्यांत सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. ग्रामीण भारतातही परिस्थिती वाईट आहे. धान्य लावणीचा हंगाम संपल्यामुळे बेरोजगारीचा दर हा गेल्या आठ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. 09 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारतातील बेरोजगारीचा एकूण दर 8.67 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याच वेळी ग्रामीण भारतात हे प्रमाण 8.37 टक्के आहे.

सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी- सीएमआयई च्या आकडेवारीनुसार, 02 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारतातील बेरोजगारीचा दर हा 7.19 टक्के होता. त्याच बरोबर, एका महिन्यापूर्वी 12 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात तो 7.43 टक्के होता, जो की आता 8.67 टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्रामीण भारताबद्दल बोलायचे झाले तर मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यातील बेरोजगारीचे प्रमाण हे दोन टक्क्यांनी वाढले आहे. 02 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात तो 6.47% होता जो आता वाढून 8.37% झाला आहे.

- Advertisement -

शहरांमध्ये बेरोजगारी वाढली
सीएमआयईच्या आकडेवारीनुसार शहरी भागात बेरोजगारांची संख्या देशातील ग्रामीण भागाच्या तुलनेत वाढली आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतरही शहरातील बेरोजगारीच्या दरात घट झाली होती, परंतु पुन्हा एकदा हा ट्रेंड बदलू लागला आहे आणि शहरी बेरोजगारीचा दर वाढला आहे. शहरी बेरोजगारीचा दर या आठवड्यात 9.31% वर पोहोचला आहे, जो मागील आठवड्यातील 8.73% पेक्षा जास्त आहे. त्याच वेळी जुलैमध्ये तो 9.15 टक्के होता.

या कारणांमुळे बेरोजगारी वाढली
तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की कृषी क्षेत्रात काम नसल्याने आणि पेणीचा हंगाम संपल्याने प्रवासी मजूर शहरांकडे परत येत आहेत. पण उत्पादन आणि वस्त्रोद्योगाच्या हळुवार गतीमुळे बेरोजगारीची समस्या आणखीनच वाढलेली आहे. कमी मागणीमुळे सध्या उत्पादनही घटले आहे. अनेक राज्यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे मिनी लॉकडाउन लादले आहेत. या कारणांमुळे या आठवड्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाचा व्यवसायावर खूपच व्यापक परिणाम झाला आहे. यामुळे, औपचारिक क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण 10 ते 12 टक्के आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.