जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही! चीनला जशास तसं उत्तर देण्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवरील लडाखच्या गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. तसंच जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं पंतप्रधानांनी चीनला यावेळी ठणकावलं. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा उल्लेख केला. ही बैठक सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. तसंच सर्व शहीद जवानांना दोन मिनिटं मौन बाळगून आदरांजली वाहिली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आम्ही नेहमीच आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत आणि मैत्रीपूर्ण पद्दतीने काम केलं आहे. नेहमी त्यांच्या विकासासाठी प्रार्थना केली आहे. अनेकदा आमच्यात मतभेदही झाले आहेत. पण मतभेद वाद होऊ नयेत यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केले आहेत. आम्ही कधीच कोणाला डिवचत नाही. पण आपल्या देशाच्या अखंडता आणि सार्वभौमत्वासोबत आम्ही तडजोड करत नाही. जेव्हा कधी वेळ आली आहे आम्ही देशाची देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्याग आपल्या राष्ट्रीय चरित्राचा भाग आहे. विक्रम आणि शौर्य आपल्या देशाच्या चारित्र्याचा भाग आहे.”

”भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असा विश्वास मला देशवासियांना द्यायचा आहे. आपल्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. यासाठी त्याची रक्षा करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. पण डिवचलं तर वेळ आल्यावर भारत उत्तर देण्यात सक्षम आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. आपले जवान मारता मारता शहीद झाले आहेत याचा देशाला अभिमान आहे असंही यावेळी नरेंद्र मोदींनी म्हटलं. नरेंद्र मोदी यांनी यावेळी सर्व मुख्यमंत्र्यांना उभं राहून शहीद जवानांना श्रद्धांजली देण्याचं आवाहन केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment