भारताच्या दोन विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूची क्रिकेट मधून निवृत्ती ; तडाखेबंद खेळीसाठी होता प्रसिद्ध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताच्या दोन्ही विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला बडोद्याचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण याने क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. युसुफने ट्विट करता याबाबत माहिती दिली. युसुफने ट्विट केले आहे की ‘मी माझ्या कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे, संघांचे, प्रशिक्षकांचे आणि सर्व देशाचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार मानतो.’ या ट्विटमध्ये युसुफने प्रसिद्धीपत्रक जाहीर करताना २०११ सालच्या विश्वचषकातील सचिनबरोबरचा फोटो आणि २००७ विश्वचषकातील धाकटा भाऊ इरफानबरोबरील फोटो शेअर केला आहे.

तसेच त्याने त्याच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘भारतासाठी २ विश्वचषक जिंकणे आणि सचिन तेंडुलकरला माझ्या खांद्यावर घेणे माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षणांपैकी एक आहे.’ याबरोबर त्याने त्याच्या कारकिर्दीतील त्याच्या कर्णधारांचेही त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत. याशिवाय त्याने बीसीसीआय आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनलाही धन्यवाद म्हटले आहे.

युसुफने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५७ वनडे सामने खेळले असुन यात २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ४१.३६ च्या सरासरीने ३३ विकेट्सही घेतल्या. तसेत त्याने २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना २३६ धावा केल्या असून १३ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर आयपीएलमध्ये युसुफने कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केले असून त्याने एकूण १७४ सामने खेळले आहेत. यात त्याने ३२०४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतकाचा आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like