भारताच्या चिनी अ‍ॅपवरील बंदी आधीच चीननं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीजिंग । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे. भारताने चीनच्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यापूर्वीच चीनने त्यांच्या देशात भारतीय वेबसाइट आणि वृत्तपत्रांच्या ऑनलाइन वाचण्यावर बंदी घातली होती. केंद्र सरकारने सोमवारी tiktok, UC ब्राऊजर यासह अनेक लोकप्रिय अ‍ॅपवर बंदी घातली आहे. भारतीयांच्या डेटा सुरक्षेचं कारण यामागे देण्यात आलं आहे.

दरम्यान, चीनमध्ये भारतीय ई-पेपर आणि न्यूज वेबसाइट बंद करण्यात आल्या आहेत. अनेक युझर्स भारतातील बातम्या वाचू शकत नाहीत. तर अनेकांना फक्त व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच व्हीपीएनसह वेबसाइट वाचता येत आहेत. दुसरीकडे चीनच्या वेबसाइट आणि वृत्तपत्र भारतात वाचले जाऊ शकतात. पण चीनमधील भारतीयांना व्हीपीएनशिवाय पर्याय नाही.

चीनमध्ये भारतीय वाहिन्याही आयपी टीव्हीसोबतच उपलब्ध आहेत. गेल्या २ दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएनही बंद आहे. व्हीपीएन हे युझर्ससाठी उपयुक्त साधन आहे, ज्याच्या माध्यमातून ऑनलाइन प्रायव्हसी ठेवण्यासोबतच स्वतःचं नेटवर्क तयार केलं जातं. व्हीपीएनमुळे आयपी अड्रेस गुप्त राहतो आणि युझरची माहिती ट्रेस करता येत नाही. पण चीनने व्हीपीएन वापरणाऱ्या युझर्सना ब्लॉक करणारं अद्ययावत तंत्रज्ञानही विकसित केलं आहे.

‘साऊथ चायना सी’च्या नोव्हेंबरमधील एका वृत्तानुसार, चीनमध्ये ब्लॉक करण्यात आलेल्या एकूण वेबसाइटची संख्या १० हजारपेक्षाही जास्त आहे. या ब्लॅकलिस्टमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप यांसारख्या दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही समावेश आहे. ब्लूमबर्ग, वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क टाइम्स यांसारखे वृत्तपत्र, ड्रॉपबॉक्स आणि गुगल ड्राईव्ह (आणि गुगलवरील इतर सर्व) यांसारखे प्लॅटफॉर्मही चीनमध्ये बंद आहेत.

‘ग्रेट फायरवॉल ऑफ चायना’
सर्वात जास्त ऑनलाइन सेन्सरशिप असणाऱ्या देशांमध्ये चीनचा समावेश होतो. देशांतर्गत इंटरनेटवर चीनची मोठ्या प्रमाणात नजर असते आणि नियमही चीन सरकारच्या मनाप्रमाणेच बनवलेले असतात. कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात जाणारी प्रत्येक वेबसाइट चीनमध्ये बंद केली जाते. चीनच्या सेन्सरशिपला ग्रेट फायरवॉल असं म्हटलं जातं. चीन सरकारकडून आयपी अड्रेस ब्लॉकिंग, डीएनएस अटॅक आणि विशिष्ट यूआरएल फिल्टर आणि एससीएमपीनुसार यूआरएलमधील कीवर्ड फिल्टर अशा साधनांचा सेन्सरशिपसाठी वापर केला जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment