नवी दिल्ली । रेल्वेच्या विविध सेवांचे विलीनीकरण करून तयार करण्यात आलेला भारतीय रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस (IRMS) कॅडर आता अस्तित्वात आला आहे. सरकारने यासंदर्भात कॅबिनेट नोटमध्ये अधिसूचना जारी केली आहे. IRMS मुळे अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या आठ सर्व्हिसेसचे एकत्रीकरण करून कॅडर तयार करण्याचा निर्णय पीयूष गोयल यांच्या रेल्वेमंत्री असताना घेण्यात आला होता.
रेल्वेने सांगितले आहे की, महाव्यवस्थापक(Railway General Manager) च्या 27 पदांमध्ये सुधारणा करून त्यांना वरचा दर्जा दिला जाईल. जुन्या सेवेतील पात्र अधिकाऱ्यांना महाव्यवस्थापक हे उच्च श्रेणीचे पद दिले जाईल याची काळजी घेतली जाईल. कॅबिनेट नोटमध्ये असेही म्हटले आहे की, केवळ IRMS चे अधिकारीच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष/कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी सदस्य होण्यास पात्र असतील.
त्यामुळे एक कॅडर तयार झाला
आतापर्यंत देशात धावणाऱ्या रेल्वेशी संबंधित विविध कॅडर होते. 2019 मध्ये, सरकारने भारतीय रेल्वेमधील अभियांत्रिकी, वाहतूक, यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल यासह विविध विभागांसाठी सध्याच्या आठ सेवांऐवजी फक्त एक कॅडर ‘भारतीय रेल्वे सेवा’ तयार करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे रेल्वेच्या कामाची प्रक्रिया आणखी चांगली होईल, असा सरकारचा विश्वास आहे. यामध्ये जलद निर्णय घेणे, संस्थेचे चांगले स्वरूप, नोकरशाहीला आळा घालणे आणि तर्कशुद्ध निर्णय घेणे याला प्रोत्साहन दिले जाईल.
रेल्वे सेवांचे एकत्रीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगून तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी 24 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले होते की, या निर्णयानंतर प्रत्येकजण खात्याच्या वरचा विचार करेल, गटबाजी संपेल. भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेबाबत सर्वांची संमती घेण्यात आली आहे. यातून भारताच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
मात्र, रेल्वेच्या विविध सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये कॅडर विलीन करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या प्रमोशनवर परिणाम होईल, असे सांगत सुरुवातीला अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. सुरुवातीला सरकारलाही जोरदार विरोध होईल असे वाटले, मात्र तसे झाले नाही.
कोण-कोणत्या सेवा विलीन झाल्या ?
या कॅडर मध्ये इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनीअर्स (IRSE), इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनीअर्स, इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स (IRSEE), इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिस (IRSS), इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनीअर्स (IRSSE), भारतीय रेल्वे सेवा वाहतूक सेवा (IRTS), भारतीय रेल्वे कार्मिक सेवा (IRPS) आणि भारतीय रेल्वे खाते सेवा (IRAS) जोडण्यात आली आहे.