काय आहे ‘क्लोन रेल्वे’ योजना? ज्यामुळे प्रवाशांना मिळेल ‘कन्फर्म’ तिकीट

नवी दिल्ली । अनलॉक ४ च्या टप्प्यापर्यंत भारतात अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सूर आहेत. कोरोना काळात प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागू नये, तसंच त्यांना वेटिंग तिकिटाच्या समस्येला तोंड द्यावं लागू नये, याची काळजी रेल्वे प्रशासनाकडून घेतली जातेय. यासाठीच भारतीय रेल्वेकडून ‘क्लोन रेल्वे’ योजना सुरू करण्यात येतेय. क्लोन रेल्वे योजनेद्वारे नागरिकांना वेटिंग तिकीट मिळाल्यानंतरही आसन उपलब्ध होऊ शकेल.

दीड-एक महिन्याच्या लांबलचक वेटिंग लिस्टच्या समस्येपासून नागरिकांच्या सुटकेसाठी रेल्वेनं क्लोन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १२ सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणाऱ्या अधिकच्या ८० विशेष रेल्वेसोबतच क्लोन रेल्वेचीही घोषणा करण्यात आली.

‘क्लोन रेल्वे’ योजनेत रेल्वे प्रशासनाकडून ज्या रेल्वेमध्ये जास्त वेटिंग लिस्ट असेल अर्थात ज्या मार्गावर प्रवाशांकडून प्रवासाची मागणी वाढलेली दिसेल त्या मार्गावर या ‘क्लोन रेल्वे’ चालवण्यात येतील. गरजेनुसार आणि लांबलचक वेटिंग लिस्ट असलेल्या रेल्वेनंतर त्याच मार्गावर त्याच क्रमांकाची आणखी एक रेल्वे चालवण्यात येईल. या क्लोन रेल्वेमध्ये वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना कन्फर्म सीट मिळणे सहज शक्य होणार आहे.

उदाहरणार्थ बिहारहून दिल्लीला निघालेल्या संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे, हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आल्यास ही रेल्वे सुटल्यानंतर त्याच क्रमांकाची, त्याच मार्गावर दुसरी ट्रेन चालविली जाईल. या रेल्वेत वेटिंग लिस्टवर असणाऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळू शकेल. या दोन्ही रेल्वे एकाच प्लॅटफॉर्मवरून निघतील. नाव आणि क्रमांक एकच असल्यानं या रेल्वेला ‘क्लोन रेल्वे’ म्हटलं गेलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like