हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे म्हंटल जात असताना दुसरीकडे बांधकाम क्षेत्राला (Construction Sector) मात्र चांगले दिवस आहेत. सध्या बांधकाम क्षेत्र हे देशातील नंबर २ चे रोजगार निर्मिती क्षेत्र म्हणून ओळखलं जात असून 2030 पर्यंत बांधकाम क्षेत्रात 10 कोटी नोकऱ्या मिळणार असा अहवाल नाईट फ्रँक इंडिया आणि रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्वेअर्सने दिला आहे. आजअखेर भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील उत्पादन USD 650 बिलियन आहे. परंतु 2030 पर्यंत हाच आकडा USD 1 ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
भारताच्या बांधकाम क्षेत्रामध्ये सध्या 7.1 कोटी (71 दशलक्ष) व्यक्ती कार्यरत आहेत आणि 2030 पर्यंत ही संख्या 10 कोटी (100 दशलक्ष) च्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. भारतातील रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रे जसजशी वाढत जातील तसतसे कुशल कर्मचार्यांची मागणी लक्षणीयरीत्या वाढेल. रिअल इस्टेट क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठी प्रगती झाली असून उत्पादकता वाढली आहे. यामुळेच आता या क्षेत्रात कुशल कामगारांची गरज वाढली आहे असे या रिपोर्ट मध्ये म्हंटल आहे. सध्याच्या 71 दशलक्ष (7.1 कोटी) कर्मचारी बांधकाम क्षेत्रात कार्यरत असले तरी यातील 81 टक्के कर्मचारी अकुशल आहेत आणि केवळ 19 टक्के कुशल कर्मचारी आहेत.
या अहवालात असेही सुचवण्यात आले आहे की कुशल कर्मचाऱ्यांची मागणी डेव्हलपर्स , बांधकाम कंपन्या आणि सल्लागार कंपन्यांकडून येईल. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारी उपक्रम, शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण संस्थांमधून कुशल मनुष्यबळाचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. मजबूत आर्थिक वाढीसाठी आणि रोजगाराच्या उद्दिष्टांची पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील कौशल्याची तफावत दूर करण्याचे महत्त्व या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.