देशात करोनाची चिंताजनक घौडदौड; रुग्ण संख्या १३ हजारांजवळ तर ४२० रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणावर होताना दिसत आहे. महाराष्ट्रासहित इतर राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वेगानं वाढत आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या १३ हजाराच्या उंबरठ्यावर आहे. देशात करोनाच्या रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ एवढी झाली आहे. अशा वेळी एक दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १ हजार ५१४ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनामुळे ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

गेल्या २४ तासात २८ मृत्यूंची नोंद झाली आहे. मृत्यूंचं प्रमाण कमी झालं आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. गेल्या २४ तासात ८२६ करोना पॉझिटिव्ह देशात आढळले आहेत. त्यामुळे आता देशातली करोना रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ झाली आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे.

दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”