न्यूज लाईन पुरस्कारामुळे अंधारात पणती लावण्याचे कार्य : इंद्रजित देशमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

एखाद्या देशाची समाजाची मानसिक स्थिती ही येथील वर्तमानपत्रांचे पहिले पान दाखवत असते. ज्यावेळी सगळीकडे अंधार असतो त्यावेळी अंधाराला शिव्या देऊन अंधार नाहीसा होत नाही, तर अंधारामध्ये पणती लावायची असते. अन् ती पणती लावण्याचे कार्य आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने न्यूज लाईन समूहाने केले आहे. जगामध्ये न्यूज व्हॅल्यु ही सकारात्मतेला असून ती खऱ्या अर्थाने न्यूज लाईन व माध्यमांनी जपली असल्याचे गौरवोद्गार शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंद्रजित देशमुख यांनी काढले.

कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहामध्ये नुकताच न्यूज लाईन सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने होते तर प्रांताधिकारी उत्तम दिघे, न्यूज लाईन माध्यम समुहाचे मुख्य संपादक प्रमोद तोडकर, कार्यकारी संचालक सागर बर्गे, सहसंपादक अमोल टकले, कार्यकारी संपादक सुहास कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांचा उत्तम व्यवस्थापक तर प्रा. डॉ. विनोद बाबर यांचा प्रेरणादायी वक्ता, सौ. कल्पना तानाजी वाकडे यांचा संस्कारदीप, राजेंद्र जाधव यांचा प्रयोगशील शेतकरी, नामदेव थोरात यांचा उद्योजकता प्रेरणा, आदर्श समाजसेवक म्हणून संदीप पवार, सौ. मिनल ढापरे यांचा कलारत्न, मनोज जगताप यांचा उदयोन्मुख उद्योजक, नवोदित साहित्यिक म्हणून अभयकुमार देशमुख, राहुल पुरोहित यांना अक्षरांचा जादुगर, कुमारी आदिती जाधव हिला लक्ष्यवेधी नेमबाज, डॉ. दत्ता कुंभार यांना संगीतरत्न तर प्रीतिसंगम हास्य परिवार या संस्थेला आरोग्यदायी हास्यतुषार पुरस्काराने सन्मान करण्यात आले.

यावेळी सीए दिलीप गुरव, प्रा. सतिश घाडगे, प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक प्रमोद तोडकर यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक सागर बर्गे यांनी मानले. कार्यक्रमास कराड शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.