पुणे प्रतिनिधी | ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण पुण्याला अगदी शोभते. पुणे हे शहर संस्कृती जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, जत्रा यांची रेल-चाल चालूच असते. संगीत, नृत्त्य यांबरोबर पुण्यात खाद्य संस्कृती ही जपली जाते. म्हणूनच तर सवाई महोत्सव असो वा आत्ताच सांगता झालेला गानसरस्वती महोत्सव असो तसेच भीमथडी जत्रा पुणेकर प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत असतात.
आता या मधे आणखीन एका जत्रेची भर पडली असून पुणेकरांसाठी आता इंद्रायणी काठी म्हणजेच भोसरी या ठिकाणी इंद्रायणी थडी चे आयोजन करण्यात येणार आहे. आमदार महेश लांडगे यांनी येत्या ८, ९, १० व ११ फेब्रुवारी २०१९ रोजी इंद्रायणी थडीचे आयोजित केले आहे. या ठिकाणी भोसरी, पिंपरी चिंचवड शहरातील तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचतगट व स्वतः महिलांनी तयार केलेल्या उत्पादनासाठी निशुल्क स्टॉल देण्यात आले आहेत. बचतगटांच्या विकासासाठी व महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी इंद्रायणी थडी चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लांडगे यांनी पत्रकारांशी बोकताना दिली.
या जत्रेचा पुणेकरांना आस्वाद घेता येणार आहे. येते गावरान खाद्य पदार्थ, पारंपरिक खेळ, बालजत्रा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. या जत्रेतून आपली संस्कृती जपली जाणार आहे.