मुंबई-पुणे वगळून इतर भागातील उद्योगांना लवकरच परवानगी; राज्य सरकारचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या विषाणूचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागांत २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्याचे संकेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. उद्योग सुरू करण्यासाठी मात्र कामगारांच्या सुरक्षित वाहतुकीची-राहण्याची व्यवस्था करण्याची अट उद्योजकांवर टाकण्यात येणार आहे. या अटींमध्ये, जे उद्योजक आपल्या कामगारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करतील, अशा उद्योजकांना कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. याचसोबत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे उद्योग नियम पाळतील आणि वाहतुकीची व्यवस्था करतील त्यांना देखील परवानगी मिळेल. एमआयडीसीमध्ये लघुउद्योगांनी एकत्र येऊन कामगारांची राहण्याची सोय केल्यास उद्योग विभाग त्यांना मदत करेल.

कोरोनामुळे देशभरात लागू केलेला लॉकडाऊन २० एप्रिलपासून काही प्रमाणात शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून परिस्थितीनुसार २१ तारखेच्या आसपास उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्योग विभागाच्या कृतिदलाने याबाबत तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

उद्योग विभागाच्या कृती आराखड्यात २० तारखेनंतर राज्यातील कोणत्या भागांतील उद्योग सुरू करता येतील, याचे एक सूत्र तयार करण्यात आले असून त्यानुसार करोनामुळे प्रतिबंध लागू आहे अशा ठिकाणी उद्योग सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पनवेल, वसई-विरार, भिवंडी, पुणे-चिंचवड तसेच नागपूर या भागांचा समावेश असेल. साधारणपणे रोजगार गमावलेल्या लोकांना उत्पादनाचे साधन मिळावे, हाताला रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्योग सुरू करण्यामागचा हेतू आहे. हे करताना शेती आधारित उद्योगांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामांसाठी मदत होईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment