महागाईचे आकडे आणि कंपन्यांचे तिमाही निकालांचा शेअर बाजारांवर होईल परिणाम

नवी दिल्ली । या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात अस्थिरता राहील. यामागील मुख्य कारण म्हणजे भू-राजकीय चिंता आणि अमेरिकेतील व्याजदरात झालेली वाढ. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सध्या बाजारातील व्यवहार एका मर्यादेत राहील. ते म्हणतात की,” या आठवड्यात गुंतवणूकदारांच्या नजरा जागतिक कल, महागाईचा डेटा आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांवर असतील. आता तिमाही निकालांची अंतिम फेरी आहे.”

याशिवाय रुपयाची अस्थिरता, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कल आणि ब्रेंट क्रूडच्या किमती या गोष्टीही बाजाराची दिशा ठरवतील. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणतात की,”अमेरिकेत व्याजदरात मोठी वाढ होण्याची शक्यता असताना जगभरातील बाजारपेठा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भू-राजकीय तणावामुळे चिंता कायम आहे.”

निवडणूक निकाल आणि महागाईचे आकडे यावर लक्ष ठेवून
मीना सांगतात की,” देशांतर्गत आघाडीवर, घाऊक आणि किरकोळ महागाईचे आकडे या आठवड्यात येणार आहेत. कंपन्यांच्या तिमाही निकालांची ही अंतिम फेरी आहे. याचा परिणाम बाजाराच्या दिशेवर होईल. काही विशिष्ट शेअर्समध्ये घडामोडी पाहिल्या जाऊ शकतात. याशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांशी संबंधित घडामोडींवरही गुंतवणूकदार लक्ष ठेवतील.” FII ची भूमिका देखील भारतीय बाजारांसाठी महत्त्वाची ठरेल, कारण ते सध्या जोरदार पैसे काढत आहेत. मात्र, शुक्रवारी FII ने भारतीय शेअर्समध्ये निव्वळ 108.53 कोटी रुपये ओतले. या महिन्यात, FII ने भारतीय भांडवली बाजारातून निव्वळ 14,930 कोटी रुपये काढले आहेत.

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयांचाही परिणाम होईल
सॅमको सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चच्या प्रमुख येशा शाह यांनी सांगितले की,”यूएसच्या चलनवाढीच्या आकडेवारीवर आलेल्या प्रतिक्रियेनंतर गुंतवणूकदार आता फेडरल रिझर्व्हची कारवाई समजून घेण्याचा प्रयत्न करतील. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा तपशील जाहीर होणार आहे. याशिवाय गुंतवणूकदार चीनच्या महागाईच्या आकडेवारीवरही लक्ष ठेवतील.” दलाल-स्ट्रीटचे गुंतवणूकदार देशांतर्गत चलनवाढीच्या आकडेवारीवरही लक्ष ठेवतील. एकूणच या घडामोडींमुळे बाजारात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक बाजारावर आहे
रेलिगेअर ब्रोकिंगचे व्हाइस प्रेसिडेंट रिसर्च अजित मिश्रा यांच्या मते, महत्त्वाच्या घडामोडी मागे टाकल्यानंतर आता गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक बाजार आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांवर असेल. मॅक्रो आघाडीवर, बाजार सोमवारी औद्योगिक उत्पादन (IIP) डेटावर प्रतिक्रिया देईल. त्याचवेळी, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की,”जागतिक कल आणि देशांतर्गत आघाडीवरील मॅक्रो इकॉनॉमिक डेटावरून या आठवड्याच्या बाजाराची दिशा ठरवली जाईल.”