Thursday, October 6, 2022

Buy now

रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढली महागाई, जागतिक मंदीचाही धोका

नवी दिल्ली I रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात जगभरातील देशांनी निर्यातीवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि इतर युरोपीय देशांसोबतच लेबनॉन, नायजेरिया आणि हंगेरीसह अनेक देशही या शर्यतीत सामील झाले आहेत. केडिया एडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की,”निर्यातीवर बंदी घालण्याच्या या शर्यतीमुळे जगभरात वेगाने चलनवाढीचा धोका तर निर्माण झाला आहेच, मात्र त्याबरोबरच मंदीची भीतीही वाढली आहे.”

दुसरीकडे, यूएन फूड एजन्सीचे म्हणणे आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्यातीवर बंदी घातल्याने जगभरात महागाई वेगाने वाढत आहे. खाद्यतेल आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती वाढल्याने जगभरातील खाद्यपदार्थांच्या महागाईत फेब्रुवारीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. या कालावधीत खाद्यपदार्थांच्या महागाईत वार्षिक आधारावर 20.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्न आणि कृषी संघटनेचा फूड प्राइज इंडेक्स जानेवारीत 135.4 अंकांवरून फेब्रुवारीमध्ये 140.7 अंकांवर पोहोचला.

अमेरिकेने लक्झरी उत्पादनांवर बंदी घातली आहे
रशिया आणि बेलारूसला निर्यात होणाऱ्या लक्झरी उत्पादनांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाने जगभरात मोठे संकट उभे केल्याचे अमेरिकेच्या डिपार्टपमेंट ऑफ कॉमर्सचे म्हणणे आहे. याला सामोरे जाण्यासाठी, युद्ध थांबवणे आवश्यक आहे, त्यासाठी रशियावर निर्बंध लादले जात आहेत. त्याचप्रमाणे युरोपियन युनियननेही रशियाला लक्झरी उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

रशियाने 200 उत्पादनांवर बंदी घातली आहे
अमेरिका आणि इतर युरोपीय देशांनी लादलेल्या निर्बंधांना प्रतिसाद म्हणून रशियानेही 200 हून जास्त उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. या उत्पादनांमध्ये ऊर्जा, टेलीकॉम, मेडिकल, व्हेईकल, शेती, लाकूड आणि त्याची उत्पादने तसेच विद्युत उपकरणे यांचाही समावेश आहे. इतर देशांच्या निर्बंधांना प्रतिसाद म्हणून हे तार्किक पाऊल उचलण्यात आल्याचे मॉस्कोचे म्हणणे आहे.

युक्रेनने गव्हासह अनेक उत्पादनांची निर्यात थांबवली
युक्रेन सरकारने जागतिक अन्न पुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गहू, ओट्स आणि इतर अन्न उत्पादनांच्या निर्यातीवर देखील बंदी घातली आहे. युक्रेन सरकारचे म्हणणे आहे की, रशियाच्या प्रखर हल्ल्यादरम्यान तेथील नागरिकांना खाण्यापिण्याची कमतरता भासू नये, म्हणून या उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत आहे. या आठवड्यात लागू करण्यात आलेल्या नवीन कृषी नियमांनुसार बाजरी, साखर, जिवंत गुरे, मांस आणि इतर उत्पादनांची निर्यात देखील बंद करण्यात आली आहे.

इंडोनेशियाने पाम तेलावर बंदी घातली आहे
इंडोनेशियानेही पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे जागतिक अन्न संकट आणखीनच वाढले आहे. इंडोनेशियाचे व्यापार मंत्री मोहम्मद लुफ्ती सांगतात की,”आपल्या देशातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात तेल सहज उपलब्ध व्हावे म्हणून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.”

या शर्यतीत हंगेरी आणि नायजेरियाचाही समावेश आहे
हंगेरीनेही वाढत्या किमतींमध्ये धान्य निर्यातीवर बंदी घातली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर किमतीत झालेली वाढ लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे हंगेरीचे कृषी मंत्री इस्तवान नागी यांनी सांगितले. अग्रगण्य जर्मन एग्रीकल्चर ट्रेड ग्रुप बेवा एजीने हंगेरीच्या निर्णयावर टीका केली. दुसरीकडे नायजेरियानेही परदेशी लोकांना थेट शेतकऱ्यांकडून कृषी उत्पादने खरेदी करण्यास बंदी घातली आहे.