हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संपुर्ण देशभरात गणेशाच्या विविध रूपातील मुर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु महाराष्ट्रातील एका मंदिरात चक्क स्त्रीच्या वेशभूषेतील गणपतीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. हे मंदिर मंगलगड किल्ल्यावर (Mangalgad) आहे. या मंदिरामध्ये स्त्री वेशभूषेतील गणपतीची मूर्ती आहे. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून येत असतात. तसेच, स्थानिक लोक विविध सणावाराच्या दिवशी चतुर्थीच्या वेळी गणपतीच्या मूर्तीची पूजा करतात.
सांगितले जाते की, मंगलगड किल्ल्यावर असलेल्या मुर्त्यांची तोडफोड औरंगजेबने केली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत काही मुस्लिम कामगारांनी या शिल्पांची पुनर्बांधणी केली. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे उभारण्यात आली. याचवेळी मंगलगड किल्ल्यावर भुलेश्वर मंदिर (Bhuleshwar Temple) देखील बांधण्यात आले, असे सांगितले जाते. हे भुलेश्वर मंदिर आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
भुलेश्वर मंदिराच्या गर्भगृहात एकूण पाच शिवलिंगे आहेत. ही शिवलिंगे एकाच खंदकात लपविली असल्यामुळे ती फक्त प्रकाशात दिसून येतात. खास म्हणजे, वर्षातून फक्त दोन वेळा महादेवाच्या पिंडीवर सूर्य किरणांचा अभिषेक केला जातो. पुणे शहरापासून 54 किमी अंतरावर असलेले भुलेश्वर मंदिर हे विलक्षण वास्तू कलेसाठी ओळखले जाते. याच मंदिरात स्त्रीच्या वेशभूषेतील गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. ही मूर्ती पाहण्यासाठी आणि मंदिराचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक माळशिरसमध्ये येत असतात.