सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगलीत छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्राणीमित्रांना जखमी अवस्थेतील इजाट प्राणी आढळून आला. भिंतीला पडलेल्या एका भगदाडात लपलेल्या या इजाटला प्राणीमित्रांनी सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात दिले.
इजाट म्हंटल कि लोक नाके मुरडतात, तसेच अनेकांच्या मनात त्याच्याबद्दल भीती सुद्धा असते. त्याचे तोंड पाहिलं कि दिवस चांगला जात नाहीत असही बोललं जात. सांगलीतील शिवाजी स्टेडियमवर काहींनी जखमी अवस्थेत असणाऱ्या इजाटला पाहिले. मागील दोन्ही पायाला दुखापत झालेल्या अवस्थेत तो आढळुन आला. इन्साफ फाँऊडैशनचे प्रमुख व समाजसेवक मुस्तफा मुजावर यांना याची माहिती मिळाल्यानंतर ते सहकारी प्राणीमित्र गणेश पाटील यांच्यासह सर्व सामग्री घेऊन तेथे दाखल झाले. सुरक्षितपणे इजाटला पकडून पुढील उपचारासाठी मंदार शिंपी व सुनिल कपाले यांच्यासोबत जाऊन वनविभागाच्या ताब्यात दिले.
त्याला पकडण्यापासून उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यापर्यंत प्राणीमित्र पापा पाटील यांनी मार्गदर्शन केले. इजाटला इंडियन स्मॉल सिव्हेट उर्फ उदमांजर म्हणूनही ओळखले जाते. हा सस्तन व मांसाहारी प्राणी असून उंदरासारखे लहान प्राणी, पक्षी, किटक हे त्याचे खाद्य आहे. निशाचर असणाऱ्या काळपट तपकिरी रंगाच्या उदमांजराच्या अंगावर लहान काळ्या ठिपक्यांच्या रेषा असतात. यांची शेपटी काळपट रंगाची असून झुपकेदार असते. त्यांची लांबी ४२ ते ६९ सेंमीच्या दरम्यान असून वजन ३ ते ४ किग्रॅ असते. यांचे अस्तित्व हे जंगलात तर असतेच शिवाय मानवी वस्तीजवळही ते आढळतात. तरीही या प्राण्याबद्दल अनेक गैरसमज आहेत.