औरंगाबाद | सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात येऊ नये म्हणजेच गेल्या वर्षीची पुनरावृत्ती टाळण्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कंबर कसली आहे. खाजगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांची नमुने घेण्यासाठी कृषी विभागाची पथके तैनात केली आहेत. औरंगाबाद परभणी व नागपूर येथील प्रयोगशाळेत बियाण्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी सुरू असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.
गेल्या वर्षी औरंगाबाद जालना बीड जिल्ह्यातील सहा हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे नवऱ्याच्या तक्रारी सहा हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या होत्या. वांझोट्या सोयाबीन बियाणे प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली होती. खंडपीठाच्या आदेशानंतर कृषी विभागाने या प्रकरणी सुमारे 70 कंपन्यांवर गुन्हे दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर कृषी खात्याकडून यंदा खासगी कंपन्यांच्या बियाणांचे नमुने तपासणीसाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घेतली आहे.
बीजप्रक्रिया आवश्यक
विभागात महाबीजच्या सोयाबीन चा तुटवडा आहे. राज्यातील कंपन्यांबरोबरच इंदूर, गुजरातच्या कंपन्यांचे बियाणेही विक्रीस आले आहे. परंतु खासगी कंपन्यांचे बियाणे वापरण्याऐवजी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात उत्पादित झालेल्या बियाणे म्हणून वापर करावा असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीनवर जैविक आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारे बीज प्रक्रिया करून त्याची उगवण क्षमता तपासावी. 70 टक्केपेक्षा जास्त उगवण क्षमता असलेल्या सोयाबीनचा कोणताही रोगजंतू नसल्याची खात्री करून त्याचा वापर करावा. यासाठी बांधावर जाऊन डेमो दिले जात असून त्याद्वारे जनजागृती केल्याचे जाधव म्हणाले.