औरंगाबाद : शहरातील औरंगाबाद येथे असलेल्या क्रांती चौकात बसवण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आणि चौथाऱ्याचे काम सूरु आहे. या चौथऱ्याचे यावर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचे काम पुण्यात सुरु असून औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ पुणे येथे जाऊन पाहणी केली.
महाराष्ट्रातील हे या प्रकारचे शिवरायांचे आत्तापर्यंतचे सर्वात भव्य शिल्प असणार आहे. हे शिल्प महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगभरात शिवरायांची किर्ती पोचवण्याचे कार्य करणार आहे. या भव्य धातू शिल्पाची निर्मिती पुण्यातील तरुण शिल्पकार दीपक थोपटे आणि त्यांचे सहकारी हे करत आहेत. शिल्पकार दीपक थोपटे यांच्याकडे या शिल्पाच्या निर्मितीची जबाबदारी असून, त्यांनी यापूर्वी अकलूज येथील शिवसृष्टी, शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले जिजाऊ आणि बाल शिवराय, पुण्यातील चिंचवड येथील चाफेकर बंधू शिल्प, श्रीशैलम येथील शिवराय स्मारक, सिंहगड येथील नरवीर तानाजी मालुसरे समाधी आणि परिसरातील मावळ्यांची शिल्पे, जेजुरी रेल्वे स्टेशन येथील बानुबाईचा वाड्याची प्रतिकृती तसेच देश-विदेशातील अनेक शिल्पे घडवली आहेत.
सुभाष देसाई यांनी चित्र कल्प कार स्टुडिओची दीपक थोपटे यांना भेट दिल्यानंतर सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्र्वारुढ पुर्णाकृती शिल्प हा एकवीस फुट उंच व बावीस फुट लांब आणि सहा टन वजनाचा आहे. हा राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरेल. हा पुतळा अतिशय रेखीव व देखीव असा झालेला आहे. या पुतळयाचे काम लवकरच पूर्ण होईल. क्रांती चौक औरंगाबाद येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आदर्श असा शिवपुतळा ठरेल असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडे, शहर अभियंता एस डि पानझडे, मुंबईतील जे जे स्कुलचे कला महाविद्यालय नितीन मिस्त्री, अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे, नगरसेविका अश्विनी पोकळे, राजाभाऊ रायकर, इतिहास अभ्यासक नंदकिशोर मते, शहरप्रमुख गजानन थरकुडे, भरत कुंभारकर, सुनीता खंडाळकर, महेश पोकळे, नीलेश गिरमे, किशोर पोकळे, राजू चव्हाण, दत्तात्रेय जोरकर, अनिल बटाने, योगेश पवार, संग्राम गायकवाड उपस्थित होते.