औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयास आज भेट देवुन विभागाच्या अंतर्गत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा केली. औरंगाबाद जिल्ह्यातील पुराणवस्तुंचे जतन व संवर्धन करण्यावर भर देवुन ऐतिहासिक स्थळांचे सुशोभिकरण करण्याच्या कामास गती देण्याच्या सुचना अधिक्षक मिलन कुमार चौले यांना केल्या.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यात जगप्रसिध्द ऐतिहासिक वस्तु व स्थळे असुन त्यास दरवर्षी हजारो देशी विदेशी पर्यटक भेट देतात. पर्यटनाच्या दृष्टिने औरंगाबादला विशेष महत्व प्राप्त असून अजिंठा एलोरा, दौलताबाद किल्ला आणि बिबि का मकबरा सारखे जगप्रसिध्द पर्यटन स्थळे आहे. जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक पर्यटन स्थळे व पुरातन वस्तुंचे जतन व संवर्धन हे भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येत असल्याने त्यांनी तांत्रिक व नियोजनबध्द पध्दतीने कामास गती द्यावी.
ऐतिहासिक स्थळ दौलताबाद येथे पार्किंगची व्यवस्था करणे, बिबी का मकबरा परिसरात रोषणाई करुन सौंदर्यीकरणाचे काम करणे तसेच रोजगारास चालना मिळावी म्हणून अजिंठा-एलोरा आणि बिबि का मकबरा येथे नियोजनबध्द फेस्टिवल आयोजन करण्याचे सुचना खासदार इम्तियाज जलील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.