मुलींच्या लग्नासाठी पैसे साठवण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणावर खर्च करा – वैष्णवी ढोरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सलाम पुणे, भरारी प्रतिष्ठान आणि श्रीराम तरुण मित्रमंडळातर्फे ‘सलाम कट्टा’ हा कार्यक्रम मंगळवार दि 14 डिसेंबर रोजी पुण्यातल्या जनता वसाहत येथे पार पडला. या कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगना व ख्वाडा चित्रपटात ‘बानू’ची भूमिका साकारणाऱ्या वैष्णवी ढोरे हिची प्रमुख उपस्थिती होती. भरतनाट्यम नृत्याचं सादरीकरण करण्यासोबतच वैष्णवीने वस्तीतील मुली आणि महिलांना मार्गदर्शनही केलं.

कार्यक्रमात बोलताना वैष्णवी ढोरेने तिच्या संघर्षाविषयी माहिती दिली. वैष्णवीचा जन्म पुण्यातल्या संत ज्ञानेश्वर वस्तीतला. वैष्णवी 2 वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं. आईने घरकामं करत वैष्णवीच्या शिक्षणावर आणि कलेच्या आवडीवर लक्ष दिलं. आईने त्यावेळी दरमहा 300 रुपये भरून भरतनाट्यमचे क्लास लावले. नियमित अभ्यास आणि क्लास करायचे असं आईचं सांगणं असायचं. त्यावेळी भरलेल्या 300 रुपयांचं चीज आज झाल्याचं वैष्णवीने यावेळी सांगितलं. कष्टकरी वस्तीतली लोकं काम करून थोडे थोडे पैसे मुलींच्या लग्नासाठी बाजूला काढतात. भविष्यात होणाऱ्या या लग्नाचा विचार आधीच न करता मुलींच्या शिक्षणावर खर्च करा, त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आवडतंय ते करुद्या असा संदेशही वैष्णवीने यावेळी दिला.

आज परदेशात माझे भरतनाट्यमचे कार्यक्रम होतात. त्यासाठी शेकडो-हजारो रुपयांचे तिकीट काढून लोकं येतात. माझी जी कला जगभरातील अनेक लोक पाहतात ती कला वस्तीतील लोकांनाही मोफत पाहता यावी या उद्देशाने मी आज कार्यक्रम करत असल्याचं वैष्णवी पुढे बोलताना म्हणाली. सलाम पुणे हे कष्टकऱ्यांचं माध्यम म्हणून मागील वर्षभर काम करत आहे. पुण्यातील कष्टकरी वस्त्यांमध्ये या माध्यमाचा विस्तार आहे. मासिक आणि युट्युब चॅनल असं या माध्यमाचं स्वरूप आहे. सलाम पुणेच्या ‘सलाम कट्टा’ उपक्रमातून लोकांना आरोग्य, करियर, आहार, रोजगार, कायदा, कला याविषयी मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती सलाम पुणेच्या योगेश जगताप यांनी दिली. या कार्यक्रमाला भरारी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्या बोम्माना, नगरसेवक प्रिया गदादे-पाटील, सूरज लोखंडे, निलेश पवार, किशोर राजपूत, वैशाली दारवटकर, अल्पना मोरे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment