आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांचे ७०व्या वर्षी निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय तसेच आशियाई कबड्डी महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांचे वयाच्या ७०व्या वर्षी जयपूर येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जनार्दनसिंग गेहलोत यांच्या मागे पत्नी डॉ. मृदुला भदोडिया- गेहलोत , मुलगा तेजस्वी, सून असा परिवार आहे.

जनार्दनसिंग गेहलोत यांची कारकीर्द
गेहलोत हे राजस्थानच्या राजकारणात सक्रिय होते. ते राजस्थान युवा काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, तर अखिल भारतीय युवा काँग्रेसचे ते सरचिटणीस होते. त्यांनी काही काळ राजस्थान सरकारमध्ये मंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. तसेच शरद पवार भारतीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष असताना गेहलोत आठ वर्षे उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. १९८४-८५ साली मडगाव (गोवा) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांमुळे शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडले. त्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी जनार्दनसिंग गेहलोत यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर गेहलोत यांनी सलग २८ वर्षे हे पद सांभाळले.

तसेच राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या बडग्यामुळे त्यांना २०१२मध्ये भारतीय हौशी महासंघाचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. पण तरीसुद्धा बहुमताच्या जोरावर त्यांनी पत्नी डॉ. मृदुला भदोडिया यांना अध्यक्ष केले व काही काळ पुन्हा एकदा कबड्डीची सर्व सूत्रे आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. तो काही काळ यशस्वीदेखील झाला. पण हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नेमलेला प्रशासक आजतागायत कायम आहे.गेहलोत यांनी कबड्डीला भारतीय ऑलिम्पिक संघटना व आशियाई ऑलम्पिक संघटनेची मान्यता मिळवून दिली. गेहलोत यांच्यामुळेच प्रो-कबड्डी लीगची स्थापना करण्यात आली. पुरुषांच्या तीन आणि महिलांच्या एक विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या आयोजनामध्ये गेहलोत यांनी मोलाचा वाटा उचलला होता.

Leave a Comment